About the Temple
नगरसेठ हरिभाई देवकरण या घराण्यातील
गांधी नाथाभाई देवकरण व हरिचंद देवकरण या दोन बंधुनी शुक्रवार पेठ, सोलापूर येथील जागा स्वस्तिश्री संवत् 1903 मध्ये स्वतः खरेदी करून त्या जागेवर स्वस्तिश्री संवत् 1905 माघ वद्य पंचमीच्या शुभदिनी सोमवार दि. 12 फेब्रुवारी, 1849 या दिवशी जैनधर्मातील प्रथम तीर्थकर, देवाधिदेव श्री 1008 आदिनाथ भगवान आणि गर्भगृहातील माता पद्मावती देवी सह अन्य सर्व जिनबिंबाची प्रतिष्ठापना करून श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर, सोलापूर (मोठे मंदिर) या सुंदर, भव्य, विशाल, शिखरबध्द मंदिराची मोठया वैभवाने पंचकल्याणक प्रतिष्ठा केली, निर्मिती केली. मंदिर निर्मितीसाठी समाजाकडून एक पैसा सुध्दा देणगी घेतली नाही. हरिभाई देवकरण यांनी स्वतःच्या मालकीच्या या मंदिराची वैयक्तिक, स्वतः अनेक वर्षे देखभाल केली. तदनंतर कालांतराने धर्मानुरागी, धर्मप्रेमी श्रीमान सेठ जिवराज वालचंद गांधी संस्थापक, पदसिध्द अध्यक्ष, पदसिध्द विश्वस्त, सेटलर यांनी ट्रस्टची निर्मिती करून
1) श्री. माणिकचंद गुलाबचंद शहा-करकमकर
2) श्री. विजयकुमार नेमचंद शहा
3) श्री. जंबुकुमार माणिकचंद शहा
4) श्री. मोतीचंद रेवचंद गांधी
या चार विश्वस्तांची कोणत्याही प्रकारची देणगी न घेता (विनामुल्य) नेमणूक – नियुक्ती केली. या मंदिर-ट्रस्टचे कायमचे पदसिध्द अध्यक्ष व पदसिध्द विश्वस्त पद हे गांधी हरिभाई देवकरण या घराण्याकडेच राहण्याचे ट्रस्टडिड प्रमाणे ठरलेले आहे. त्या प्रमाणे गांधी हरिभाई देवकरण या घराण्यातीलच सर्वस्वी धर्मानुरागी, धर्मप्रेमी श्रीमान सेठ जिवराज वालचंद (संस्थापक, पदसिध्द अध्यक्ष व पदसिध्द विश्वस्त, सेटलर ), रतिलाल ( उर्फ भैय्या ) नानचंद, गुलाबचंद (उर्फ बाबूकाका ) हिराचंद यांनी या मंदिराची धुरा सांभाळली. हल्ली या मंदिराचे पदसिध्द अध्यक्ष व पदसिध्द विश्वस्त म्हणून स्वर्गीय सेठ हिराचंद रामचंद ( उर्फ हिराकाका ) यांचे नातू व स्वर्गीय सेठ गुलाबचंद ( उर्फ बाबूकाका ) हिराचंद यांचे कनिष्ठ सुपुत्र धर्मानुरागी, धर्मप्रेमी श्रीमान सेठ सुनीलभाई गुलाबचंद गांधी- सोलापूर हे सन 2005 पासून या मंदिराची धुरा समर्पितभावनेने, निष्ठापूर्वक सांभाळीत आहेत.
पंचायतीचे सेठ व श्री आदिनाथ मंदिराचे संस्थापक, पदसिध्द अध्यक्ष व पदसिध्द विश्वस्त, सेटलर धर्मानुरागी, धर्मप्रेमी श्रीमान सेठ जिवराज वालचंद गांधी यांनी श्री आदिनाथ मंदिरास वीर संवत् 2475 माघ वद्य पंचमीस मंदिराची 100 वर्षे पूर्ण झाल्याने शत सांवत्सरिक महोत्सव मोठया दिमाखात पार पाडला. तसेच दि. 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी, 1949 मध्ये श्री आदिनाथ पंचकल्याणिक प्रतिष्ठा महोत्सव स्वत:तर्फे मोठया भव्य प्रमाणात करून स्तुत्य कार्य केले आहे.